ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या मैदानाला टोक्यो ऑलिम्पकिमध्ये भाला फेकीत सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राचे नाव देण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या समारंभाचे उद्घाटन केले. ‘नीरज चोप्रा स्टेडियम आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट’ असे नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे. यावेळी नाईक सुभेदार दीपक पुनिया यांचा विशेष मेडल देऊन सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच नाईक अर्जुनलाल जाट, नाईक सुभेदार विष्णू सर्वनंद, महाराष्ट्रातील नाईक सुभेदार अविनाश सावळे यांचाही यावेळी सन्मान केला गेला. यावेळी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे उपस्थित होते.
राजनाथ सिंह खेळाडूंचे अभिनंदन करताना म्हटले की, आपल्या खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव जगभरात पोहोचवे. मागील दीड वर्ष कोविड महामारी असूनही, टोक्योमध्ये इतकी मोठी कामगिरी करणे ही काही छोटी गोष्ट नाही. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट खेळाडूंच्या कामगिरीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. मी या संस्थेबद्दल आदर व्यक्त करतो.
लॉकडाऊन दरम्यान, जेव्हा आमच्या खेळाडूंना सुविधा मिळण्यात अडचण येत होती, त्या वेळी त्यांच्या घरची उपकरणे पोहचवण्याचे काम आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटने केले होते, अशी माहिती मला देण्यात आली आहे. एवढेच नाही तर नेमबाजांसाठी घरच्या ठिकाणी शूटिंग रेंजही बनवण्यात आल्या आहेत. यासोबतच आता येणाऱया काळात आपण सर्व प्रकाराच्या खेळाकडे लक्ष देणार आहोत, यातून अधिकाधिक कसे पदके मिळतील. याकडे विशेष लक्ष असणार आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले.