प्रतिनिधी /वास्को
आल्त दाबोळी भागातील विशाल मेगा मार्टजवळील एका महा निवासी प्रकल्पातून उघडय़ावर सोडण्यात येणाऱया सांडपाणी प्रकरणाची गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने दखल घेतली आहे. सोमवारी मंडळाच्या एका पथकाने चिखली बायो प्रुसेडर्सच्या कार्यकर्त्यांसमवेत या प्रकाराची पाहणी केली.
आल्त दाबोळीतील त्या महा निवासी प्रकल्पातून सांडपाणी रस्त्याच्या उघडय़ा गटारामध्ये सोडण्यात येत असल्याचा प्रकार चिखली बायो प्रुसेडर्स या संघटनेच्या सिरील फर्नांडिस व ऍडवीन मास्कारेन्हास यांनी उघडकीस आणला होता. त्यांनी या प्रकरणी वास्को पोलीस स्थानक तसेच गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे सोमवारी दुपारी गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे साहाय्यक पर्यावरण अभियंते ऍश्ली परेरा व अन्य दोघा अभियंत्यांसह आल्त दाबोळीतील त्या सांडपाणी सोडण्यात येत असलेल्या ठिकाणी येऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत बायो प्रुसेडर्सचे कार्यकर्ते उपस्थित होते. या पाहणीनंतर जवळच्या आसोय गावातील नागरिकांची या पथकाने भेट घेतली. तेथील झऱयांचीही पाहणी केली. यावेळी गावातील नागरीकांनी सांडपाण्यामुळे गावाच्या जमीनीतील पाणी प्रदुषीत होत असल्याचे तक्रार मांडली. पूर्वी येथील जमीनील पाण्याचा पिण्यासाठी बिनदिक्कतपणे वापर करण्यात येत होता. आता हे पाणी पिण्यासाठी वापरण्यास भिती वाटत असल्याची तक्रार ग्रामस्थानी केली. मोठय़ा निवासी प्रकल्पातून खाली उतरणारे सांडपाणी रोखून गावातील जलसाठय़ांचे रक्षण करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.