काही लोक उगाचच मोठय़ा आवाजात बोलतात. त्यांचं साधं बोलणंही कर्कश आणि भांडणासारखं वाटतं. लोक अशा माणसांपासून थोडं लांबच राहतात. मोठय़ा आवाजात बोलल्यामुळे कानांनाही खूप त्रास होतो. तुम्हीही उगाच मोठय़ाने बोलता का, तुम्हाला याबाबत मिळालेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आहात का, लोक तुमच्यापासून लांब जात आहेत का, असं असेल तर काळजी घ्या. मोठय़ा आवाजात बोलण्याची समस्या सोडवण्यासाठी काही उपाय करता येतील.
* बरेचदा आपलं म्हणणं मांडण्याच्या नादात आपण तावातावाने बोलू लागतो. मग आवाज चढतो आणि हीच सवय लागते. हे टाळण्यासाठी समोरच्या व्यक्तीचं बोलणं नीट ऐकून घ्या. दुसर्यांना नेमकं काय सांगायचं आहे ते आधी जाणून घ्या. आपलं म्हणणं कसं मांडायचं याबाबत विचार करून ठेवा.
* आजूबाजूला खूप आवाज असेल तर आपल्याला मोठय़ाने बोलावं लागतं. कालांतराने आपण मोठय़ाने बोलू लागतो. म्हणूनच गर्दीच्या ठिकाणी किंव खूप कोलाहल असल्यास फोनवर बोलणं टाळा.
* मोठय़ाने बोलण्याची सवय मोडण्यासाठी घरच्यांची मदत घ्या. आवाज चढू लागल्याचं जाणवल्यावर सूचना करण्याबाबत घरच्यांना सांगा. तुम्ही स्वतःही आवाजाकडे लक्ष देऊ शकता.
* तुम्ही घरी हळू बोलण्याचा सराव करू शकता. सोबतीला आवाज रेकॉर्ड करून ऐका. तुमचा आवाज कुठे आणि कधी चढतो हे जाणून घेणं यामुळे शक्य होईल.