नवी दिल्ली : भारताचा कनिष्ठ गटातील हातोडाफेक ऍथलीट आशिष जाखर उत्तेजक चांचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सीने (नाडा) घेतला आहे. आशिष जाखरने दोनवेळा आशियाई स्पर्धेत कनिष्ठांच्या हातोडाफेक प्रकारात विजेतेपद मिळविले आहे.
हरियाणाचा कनिष्ठ ऍथलीट आशिष जाखर विश्व कनिष्ठांच्या ऍथलीटिक्स स्पर्धेत हातोडाफेक प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. जाखरची उत्तेजक चांचणी घेण्यात आली त्यावेळी त्याच्या मुत्रल नमुन्यात निर्बंध घातलेले द्रव आढळले. जाखरच्या बंदीचा कालावधी 21 ऑक्टोबर 2019 पासून सुरू झाला आहे. या दिवशी तो उत्तेजक चांचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर हंगामी बंदी घालण्यात आली होती.
2018 साली झालेल्या विश्व कनिष्ठांच्या ऍथलीटिक्स स्पर्धेत 20 वर्षांखालील वयोगटात जाखरने हातोडाफेकमध्ये चौथे स्थान मिळविले होते.
गेल्या सप्टेंबर महिन्यात पुणे येथे झालेल्या आंतर सेनादलाच्या ऍथलेटिक्स स्पर्धेवेळी जाखरची उत्तेजक चांचणी घेण्यात आली होती. हातोडाफेक प्रकारात तो राष्ट्रीय विक्रमवीर ठरला होता.