प्रतिनिधी / पंढरपूर
आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आषाढीला मुख्यमंत्र्यांसोबत ‘मानाचा वारकरी’ म्हणून विठोबाची शासकीय महापूजा होत असते. यंदा हाच मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील विणेकरी विठ्ठल बडे यांची चिठ्ठीने निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या आषाढी एकादशीचा सोहळा कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. यंदा पंढरीत एकादशीचा सोहळा होणार आहे. मात्र वारकरी या एकादशीला पंढरीला नाहीत. चंद्रभागेच्या तीरावर कुठलाही प्रकारचा हरिनामाचा जयघोष यंदा नाही. अशातच आषाढीला मानाचा वारकरी म्हणून विठोबाची शासकीय महापूजा कोण करणार ? हा उत्सुकतेचा विषय होता. यामध्ये मंदिरातील विणेकरी यांची “मानाचा वारकरी” म्हणून निवड करण्यात आली आहे.
विठ्ठल बडे हे मंदिराच्या सभामंडपात विनेकरी म्हणून काम पाहतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी विणेकरी म्हणून आपली सेवा बजावली आहे. यंदा मानाचा वारकरी निवडण्यासाठी मंदिरातील सहा विणेकरी यांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या होत्या. यामधील एका चिठ्ठीच्या निवडीने मानाचा वारकरी म्हणून 84 वर्षीय विठ्ठल बडे यांची निवड करण्यात आली.
प्रतिवर्षी आषाढी एकादशीला महापूजा सुरू होण्यापूर्वी दर्शन रांगेतील वारकरी दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून महापूजा करण्याची संधी मिळते. यंदा भाविकांना दर्शन नाही. त्यामुळे मानाचा वारकरी निवडणे हे जिकरीचे होते. यातच मंदिर समितीने मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील विणेकरी यांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता या मानाच्या वारकऱ्यांची निवड ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून करण्यात आली.