भाजपने उपस्थित केला लँड जिहादचा मुद्दा
आसामच्या मोरीगाव येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लव्ह आणि लँड जिहादवर कायदा आणणार असल्याचे आश्वासन दिले आहे. आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आल्यावर लँड आणि लव्ह जिहादवर कायदा तयार करणार असल्याचे शाह यांनी जनतेला सांगितले आहे. शाह यांचे वक्तव्य 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीशी जोडून पाहिले जात आहे. यात आसाममध्ये मुस्लिमांचे लोकसंख्येतील प्रमाण 30 टक्के असल्याचे म्हटले होते. तर काँग्रेसने भाजपवर धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करण्याचा आरोप केला आहे.
शाह यांचे विधान काँग्रेससोबत आघाडी केलेल्या एआययुडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांना लक्ष्य करणारे होते. बदरुद्दीन अजमल यांचे सरकार सत्तेवर आल्यास आसाममध्ये घुसखोरी आणि लव्ह जिहादची प्रकरणे वाढतील असा आरोप भाजप करत आहे. आसाममध्ये काँग्रेसच्या शासनकाळात मुस्लीम लोकसंख्या वेगाने वाढली असून याचमुळे राज्यात लव्ह जिहाद आणि घुसखोरीसारख्या गुन्हय़ांना राजकीय संरक्षणही मिळत राहिल्याचा दावा भाजपचे अनेक नेते करत आहेत.
आसाममध्ये 2001 मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 5 टक्के होती, 2011 मध्ये हे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत पोहोचले, अशा स्थितीत आगामी काळात घुसखोरीमुळे आसाम एक मुस्लीमबहुल राज्य होईल, जेथे देशाबाहेरील घटकांचा मोठा हस्तक्षेपही असेल असा दावा भाजपचे नेते वारंवार करत आहेत. आसाममध्ये घुसखोरीचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. भाजप सत्तेवर आल्यास घुसखोरांना राज्यातून बाहेर काढण्यात येणार असल्याचा दावा सत्ताधाऱयांकडून करण्यात येत आहे.
7 जिल्हय़ांमध्ये प्रमाण वाढले
आसाममधील 11 जिल्हय़ांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक झाली आहे. काँग्रेसच्या शासनकाळात घुसखोरांना संरक्षण देत अनेक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. बदरुद्दीन अजमल यासारखे नेते काँग्रेससह सत्तेवर आल्यास पुन्हा हेच घडणार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
सीमावर्ती जिल्हय़ांचा उल्लेख
मोरीगावसह करीमगंज, नाइगाव, गोलपाडा, हैलाकाडी, धुबरी, बारपेटा या जिल्हय़ांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण अधिक आहे. हे सर्व भाग सीमावर्ती क्षेत्रात असून येथे बांगलादेशमार्गे होणारी घुसखोरी एक मोठा मुद्दा आहे. एआययुडीएफच्या मदतीने काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील घुसखोरी रोखणे अशक्य होईल असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तर आसाममध्ये एनआरसी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीही त्यासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.