न्यायालयाचा आदेश, प्रत्येकी 20 हजार रुपये ठोठावला दंड
प्रतिनिधी/ बेळगाव
इंडोनेशियाहून बेळगावला आलेल्या तबलीगी जमातच्या दहा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दोन दिवस कैद व प्रत्येकी 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
व्हीसा नियमांचे उल्लंन केल्याच्या आरोपावरुन 5 एप्रिल 2020 रोजी सर्व दहा जणांवर माळमारुती पोलीस स्थानकात सरकारतर्फे एफआयआर दाखल करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली होती. त्यांना अटकही करण्यात आली होती.
पोलिसांनी सर्व दहा जणांचे पासपोर्ट जप्त केले आहेत. भारतात येण्यासाठी पर्यटन व्हीसा मिळवून नंतर 2 मार्च रोजी इंडोनेशियातून दिल्लीला येवून निजामुद्दीन परिसरातील तबलीगी जमातच्या मरकजमध्ये झालेल्या धर्मसभेत त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर 9 मार्च रोजी ते बेळगावला आले आहेत.
माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील रामतीर्थनगर येथे त्यांचे वास्तव्य होते. सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात त्यांना क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी या सर्व दहा जणांना न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवस कारावास (याआधीच भोगले आहे) व प्रत्येकी 20 हजार रुपये दंड ठोठावले आहेत.