कोरोनाबाधितांची संख्या इंदोरमध्ये सातत्याने वाढत असली तरीही लोक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यास तयार नाहीत. शासकीय निर्देशांना पायदळी तुडवत लोकांची गर्दी रस्त्यांवर दिसून येत आहे. इंदोरच्या चंदननगर भागात पोलिसाने अशा लोकांना घरी परतण्यास सांगितल्यावर त्यांनी दगडफेक सुरू केली आहे. या दगडफेकीत एक पोलीस जखमी झाला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू झाला असून आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
टाटपट्टी बाखलनंतर इंदोरच्या चंदननगर भागात पोलिसावर दगडफेक झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेची चित्रफित समोर आली असून यात जवानावर युवक दगडफेक करताना दिसून येत आहेत. चित्रफितीची पडताळणी करत आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. काही युवक हातात काठी घेऊन पोलिसाचा पाठलाग करत असल्याचे यात आढळून येते. इंदोरमध्ये कठोर टाळेबंदी लागू असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. अशा स्थितीत कुठलाही व्यक्ती घरातून बाहेर पडल्यास पोलीस त्वरित हस्तक्षेप करतात. दगडफेकीप्रकरणी त्वरित कारवाई केली जाणार आहे. अशाप्रकारच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नसल्याचे पोलीस महानिरीक्षकांनी म्हटले आहे.