पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले संकेत
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात पेट्रोल अन् डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीवरून विरोधी पक्ष सातत्याने टीका करत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरांवरून आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विधान केले आहे. पेट्रोलियम उत्पादक देशांना कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय ग्राहकांना इंधनाच्या वाढत्या किमतींपासून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रधान वाराणसीतील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. एप्रिलपर्यंत हे दर खाली येण्यास प्रारंभ होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
मागील वर्षी एप्रिलमध्ये प्रमुख तेलउत्पादक देशांनी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कोरोना महामारीमुळे मागणीत मोठी घट झाली होती. हे देश अधिक कमाईच्या नादात इंधनाचे कमी उत्पादन करत आहेत. सद्यकाळातही इंधनाचे उत्पादन तुलनेत कमीच आहे. इंधनाची मागणी आता वाढली आहे. कोरोना महामारीची मागील वर्षी असलेली स्थिती आता तशीच राहिलेली नाही. मागणी अधिक वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचे प्रधान म्हणाले.
देशात पेट्रोल-डिझेल आणि सिलिंडरचे दर कमी कधी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याचा अनुमान कुणीच लावू शकत नाही, पण घरगुती सिलिंडर, डिझेल आणि पेट्रोलचे दर मार्च किंवा एप्रिलपर्यंत कमी होऊ शकतात असे उत्तर प्रधान यांनी दिले आहे.