डॉक्टर-इतर कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱया कामगारांसाठी शासनातर्फे विविध सुविधा उपलब्ध केल्या जातात. पण त्याचा लाभ होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशोकनगर मुख्य दवाखान्यासह विविध ठिकाणी कामगारांसाठी इएसआय दवाखाना सुरू केला आहे. पण दवाखान्यामध्ये डॉक्टर व इतर कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याची तक्रार होत आहे.
शहर व उपनगरामध्ये असंख्य कारखाने व इतर व्यवसाय आहेत. कामगारांना आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने इएसआय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याकरिता कामगाराच्या वेतनामधून इएसआयची रक्कम कापून घेतली जाते. पण कामगाराच्या हितावह कोणत्याच उपाययोजना हाती घेतल्या जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. शहर व उपनगरमध्ये राहणाऱया कामगारांसाठी चार ठिकाणी इएसआय दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. पण विविध ठिकाणी असलेल्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
वैद्यकीय अधिकारी नसल्याची तक्रार
ठराविक वेळेत दवाखाना उघडला जात असल्याने कामगारांसाठी सुरू करण्यात आलेला दवाखाना असून नसल्यासारखा असल्याची टीका नागरिक करीत आहेत. दवाखान्याची वेळ सकाळी साडेआठ ते साडेअकरा आणि दुपारी साडेचार ते रात्री साडेसातपर्यंत आहे. पण यावेळेनुसार वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याची तक्रार कामगारवर्गामधून होत आहे.
कामगारांना कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास वैद्यकिय अधिकाऱयांअभावी अन्य दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याने खर्चिक होत आहे. वेतनामधून इएसआयची रक्कम भरूनही औषधोपचाराकरिता अन्य दवाखान्यात पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार होत आहे.
कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यावर उपचार करण्यासाठी अशोकनगर येथे असलेल्या मुख्य इएसआय रुग्णालयात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसतात. तसेच कामगारांना व्यवस्थित माहिती देत नसल्याची तक्रार होत आहे. कामगार वर्गाची हेळसांड होत आहे. त्यामुळे इएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दवाखान्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे.