कडवा प्रतिकार करणाऱया ऑस्ट्रियावर अतिरिक्त वेळेत इटलीने नोंदवले दोन गोल
वृत्तसंस्था/ लंडन
इटलीने ऑस्ट्रियावर मात करीत युरो चषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात कसेबसे यश मिळविले. बदली खेळाडू फेडेरिको चिएसा व मॅटेव पेसिना यांनी अतिरिक्त वेळेत नेंदवलेल्या गोलांमुळे इटलीने ही लढत 2-1 अशी जिंकत आगेकूच केली.
निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर जादा वेळेत इटलीने 2 व ऑस्ट्रियाने एक गोल नेंदवला. विशेष म्हणजे बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या खेळाडूंनीच हे गोल नोंदवले. साखळी फेरीत इटलीने दमदार प्रदर्शन केले होते. पण बाद फेरीत त्यांच्या खेळात ढिलाई आली आणि ऑस्ट्रियाच्या आक्रमणापुढे त्यांच्यावर स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. युरोपियन चॅम्पियनशिपच्या बाद फेरीत प्रथमच खेळणाऱया ऑस्ट्रियाने सामन्याच्या दुसऱया सत्रात गोल नोंदवून इटलीचे आव्हान जवळपास संपुष्टातच आणले होते. पण मार्को अरनॉटोविचने नोंदवलेला हा गोल व्हीएआर रिव्हय़ूनंतर रद्द करण्यात आल्याने इटली संघ थोडक्यात बचावला.
दुसऱया सत्राच्या अखेरच्या टप्प्यात प्रशिक्षक मॅन्सिनी यांनी आघाडीतील चार खेळाडूंना बदलले. त्यांची ही चाल मात्र यशस्वी ठरली. युवेंटसकडून खेळणाऱया चिएसा व ऍटलांटाचा मिडफील्डर पेसिना यांनी अप्रतिम गोल नोंदवून इटली संघाची लाज राखली. 95 व्या मिनिटाला चिएसाने जोरदार फटक्यावर डॅनियल बॅचमनलाला चकवत पहिला गोल नोंदवला आणि दहा मिनिटानंतर पेसिनाने दुसरा गोल नोंदवला, तोच शेवटी निर्णायक ठरला. पेसिनाने वेल्सविरुद्धच्या लढतीतही गोल नोंदवला होता. पिछाडीवर पडले तरी ऑस्ट्रियाने धाडशी खेळ करीत आक्रमण चालूच ठेवले होते. त्यात त्यांना यशही आले. सामना संपण्यास सहा मिनिटे असताना बदली खेळाडू सासा कॅलाझिचने 114 व्या मिनिटाला गोल नोंदवून इटलीची आघाडी कमी केली आणि त्यांच्यावरील दडपणही वाढवले. पण रेफरीनी सामना संपल्याची शिटी वाजवली तेव्हा इटलीला हायसे वाटले आणि त्यांच्या खेळाडूंनी मग जल्लोष सुरू केला. इटली संघ सलग 31 सामन्यात अपराजित राहिला असून त्यांचा हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. पोर्तुगाल किंवा बेल्जियम यापैकी एका संघाविरुद्ध त्यांची उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडणार आहे.
ऑस्ट्रियन खेळाडूंनी या सामन्यात आक्रमक खेळावर भर दिला होता. इटलीच्या खेळाडूंकडून मात्र निराशाजनक प्रदर्शन झाले. मात्र काही वेळा त्यांनी आक्रमणही केले. स्पिनाझोलाने एका वाईड चेंडूवर ताबा घेत निकोला बरेलाकडे तो पास केला. निकोलाने त्यावर जोरदार फटका लगावला होता. पण गोलरक्षक बॅचमनने सूर मारत तो अचूक थोपवला. त्यानंतर सिरो इमोबाईलनेही 25 मीटर्सवरून मारलेला जबरदस्त फटका बारला लागून परतल्याने इटलीची ही संधीही वाया गेली. ऑस्ट्रियानेही इटलीच्या बचावफळीतील त्रुटीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. अशाच एका प्रयत्नात मार्को अरनॉटोविचने मारलेला फटका क्रॉसबारवरून बाहेर गेला. त्यांचा कर्णधार डेव्हिड अलाबाने मारलेला फ्री किक फटकाही बारवरून गेला तर 65 व्या मिनिटाला अरनॉटोविचने हेडरवर गोल नोंदवला होता. पण व्हीएआरची मदत घेत त्याला ऑफसाईड ठरवित पंचांनी तो गोल फेटाळून लावला. सामन्याची वाटचाल अतिरिक्त वेळेकडे चालली असताना मॅन्सिनी यांनी मार्को व्हेराटी, बरेला यांच्या जागी मॅन्युएल लोसाटिली, मॅटेव पेसिना यांना मैदानात उतरवले आणि नंतर चिएसा व आंद्रे बेलोटी यांनाही उतरवले. त्यांची ही चाल मात्र यशस्वी ठरली आणि त्यापैकी दोघांनी गोल नोंदवून इटलीला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले.
आजचे सामने
1) क्रोएशिया वि. स्पेन
वेळ ः रात्री 9.30 वाजता
स्थळ ः कोपनहेगन
2) फ्रान्स वि. स्वित्झर्लंड
वेळ ः मध्यरात्री 12.30 वाजता
स्थळ ः बुचारेस्ट.