युरो चषक फुटबॉल चॅम्पियनशिप फायनल – लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर निर्णायक लढत
वेम्बले-लंडन / वृत्तसंस्था
येथील वेम्बले स्टेडियमवर घरच्या मैदानावर इंग्लंडचा संघ इटलीविरुद्ध युरो चषक फायनलसाठी मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांच्यासमोर 55 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचे मुख्य लक्ष्य असेल. 1966 फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर इंग्लंडला जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. दुसरीकडे, इटलीचा संघ मागील 33 सामन्यांमध्ये अपराजित असून हीच घोडदौड या निर्णायक लढतीतही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 12.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.
इंग्लंडचा संघ 1966 नंतर 1990 व 2018 विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाच्या समीप होता. मात्र, दोन्ही वेळा त्यांची निराशा झाली. ती कसर येथे भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र, सनसनाटी निकाल देण्यासाठी खास ओळखल्या जाणाऱया इटलीने त्यांना धक्का दिला तर त्यातही आश्चर्याचे कारण नसेल, असे चित्र आहे.
प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी ताज्या दमाच्या इंग्लिश संघात ठासून उर्जा भरली असून दडपण असले तरी संघ नैसर्गिक खेळ साकारत विजय खेचून आणेल, यावर त्यांचा विश्वास आहे. डेन्मार्कविरुद्ध उपांत्य लढतीत हॅरी केनने पेनल्टीवरील रिबाऊंडवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत याचा उत्तम दाखला दिला. हॅरी केनने या युरो हंगामात इंग्लंडतर्फे सर्वाधिक 4 गोल केले आहेत.
त्यापूर्वी, रोममधील उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी वेम्बलेवर जर्मनीचा फडशा पाडला, ते लक्षवेधी ठरले. क्रोएशिया व झेक प्रजासत्ताकविरुद्ध दमदार विजयामुळे त्यांनी डी ग्रूपमध्ये अव्वलस्थान संपादन केले होते. आता आपल्या पहिल्यावहिल्या युरो चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळताना जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
इटलीचा संघही ताकदीने लढणार
एकीकडे, इंग्लिश संघ आपल्या प्रयत्नात ज्याप्रमाणे कसर सोडणार नाही, त्याचप्रमाणे इटलीचा संघ देखील संधी निर्माण करुन त्याचे सोने करण्यासाठी विशेष आसुसलेला असणार आहे. प्रशिक्षक रॉबर्टो मॅन्सिनी यांच्या प्रशिक्षणाखालील या संघाने उपांत्य फेरीत स्पेनविरुद्ध पेनल्टी शूटआऊटची लढाई ज्या तडफेने जिंकली, त्याने इटालियन जिद्द दिसून आली आहे.
लिओनार्डो स्पिनॅझोलाच्या दुखापतीनंतरही उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित बेल्जियमला मात देत या संघाने एकच खळबळ उडवून दिली होती. त्यापूर्वी, फक्त उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी त्यांना एक्स्ट्रा टाईमपर्यंत झुंजावे लागले होते. इटलीला 3 वर्षांपूर्वी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रताही मिळवता आली नव्हती. मात्र, त्यानंतर जिद्दीने खेळ साकारत 33 सामन्यात अपराजित राहत त्यांचा विजयरथ फायनलमध्ये पोहोचला आहे. येथे विजय संपादन करत महत्त्वाच्या स्पर्धेतील 10 वे जेतेपद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आजच्या लढतीला 60 हजार प्रेक्षक हजर राहतील, अशी अपेक्षा आहे.
थोडक्यात महत्त्वाचे
@इटलीचा संघ प्रतिष्ठेच्या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध एकदाही पराभूत झालेला नाही. 1980 युरो स्पर्धेत त्यांनी 1-0 असा विजय संपादन केला होता.
@इटलीने एखाद्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचण्याची ही दहावी वेळ आहे. ते विश्वचषकात 6 वेळा व युरो चषकात 4 वेळा फायनलमध्ये पोहोचले.
@इंग्लंडचा संघ युरोपियन चॅम्पियनशिप फायनलमध्ये दाखल होणारा एकूण 13 वा संघ ठरला आहे.
@इटलीचा संघ सर्व स्पर्धांमध्ये मिळून मागील 33 सामन्यात अपराजित राहिला आहे. इटलीच्या इतिहासातील हा विक्रम आहे. यादरम्यान त्यांनी 86 गोल केले व केवळ 10 गोल स्वीकारले आहेत.
@वेम्बले स्टेडियमवर एखाद्या बडय़ा स्पर्धेतील (युरो-वर्ल्डकप) ही तिसरी फायनल आहे. यापूर्वी दोन्ही फायनल्स एक्स्ट्रा टाईममध्ये निकाली झाल्या. 1966 विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडने जर्मनीला तर युरो 1996 फायनलमध्ये जर्मनीने झेक प्रजासत्ताकला पराभवाचे धक्के दिले.
दोन्ही संघांची स्पर्धेतील वाटचाल
इंग्लंड / सामना / इटली
क्रोएशियाविरुद्ध 1-0 ने विजय / पहिली साखळी लढत / तुर्कीविरुद्ध 3-0 ने विजय
स्कॉटलंडविरुद्ध 0-0 बरोबरी / दुसरी साखळी लढत / स्वित्झर्लंडविरुद्ध 3-0 ने विजय
झेकविरुद्ध 0-1 ने पराभव/ तिसरी साखळी लढत / वेल्सविरुद्ध 1-0 ने विजय
जर्मनीविरुद्ध 2-0 ने विजय / उपउपांत्यपूर्व लढत /ऑस्ट्रियाविरुद्ध 2-1 ने विजय
युक्रेनविरुद्ध 4-0 ने विजय / उपांत्यपूर्व लढत / बेल्जियमविरुद्ध 2-1 ने विजय
डेन्मार्कविरुद्ध 2-1 ने विजय / उपांत्य लढत / स्पेनविरुद्ध 4-2 ने विजय