सर्वसामान्यांच्या वेतनाहून अधिक आठवडय़ाची कमाई
जगात प्रत्येक जण अत्यंत जलदपणे पैसे कमाविण्याच्या पद्धती शोधत असतो. अनेक लोक या शोधात कित्येक वर्षे घालवून बसतात, तर काही जण मात्र हुशारीने पैसे कमाविण्याच्या अनोख्या पद्धती शोधून काढतात. इंग्लंडमधील एका व्यक्तीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे, या व्यक्तीने पैसे कमाविण्याची अशी पद्धत शोधून काढली आहे, ज्याबद्दल सर्वांना माहिती आहे, परंतु अशा प्रकारे देखील पैसे कमावता येतात याचा विचार कुणीच केला नसेल.
लंडनच्या फुलहम येथील रहिवासी 31 वर्षीय प्रेडी बेकिटच्या कामाबद्दल ऐकल्यावर समोरचा व्यक्ती अवाप् होतो. प्रेडी रांगेत उभे राहतो. हे कसले काम असा विचार नक्कीच मनात आला असेल. परंतु प्रेडी हे काम मागील 3 वर्षांपासून करत असून भरपूर पैसेही त्याने कमाविले आहेत. प्रेडी लोकांकडून पैसे घेत त्यांच्या जागी रांगेत उभा राहतो.
लोक देतात पैसे
लोक अत्यंत प्रसिद्ध गोष्टींसाठी माझी सेवा घेतात, एखाद्या म्युझिक कॉन्सर्टसाठी तिकीट घेण्याच्या रांगेत किंवा एखाद्या संग्रहालयाच्या प्रदर्शनाचे तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याकरता लोक पैसे देतात. एकदा एका वृद्ध व्यक्तीने व्ही अँड ए म्युझियमचे तिकीट खरेदी करण्यासाठी मला पैसे दिले होते. तेव्हा आणखीन काही वृद्धांनी तिकिटासाठी पैसे दिले. 3 तास रांगेत राहून तिकीट खरेदी केले आणि मग प्रत्येकाकडून चांगली रक्कम घेतल्याचे प्रेडी सांगतो.
तासात 2 हजारांची कमाई
प्रेडी एक तासासाठी 2 हजार रुपये आकारतो आणि अनेकदा एका दिवसात 16 हजारांहून अधिक रुपये कमावितो. त्याची कमाई एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या वेतनापेक्षाही अधिक आहे. प्रेडीचे ग्राहक बहुतांशकरून वृद्ध लोक असतात. परंतु अनेकदा कमी वयाचे लोक देखील त्याला रांगेत उभे राहण्यासाठी पैसे देतात. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा प्रत्येक ऋतूत तो रांगेत उभा राहण्यासाठी तयार असतो.