वृत्तसंस्था / पणजी
2020-21 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी एससी इस्ट बंगाल फुटबॉल क्लबने मंगळवारी 22 जणांचा संघ घोषित केला असून यामध्ये नुकताच करार करण्यात आलेल्या जेजे लालपेखलुआ आणि नारायण दास यांचा समावेश आहे.
इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी इस्ट बंगाल क्लबने घोषित केलेल्या 22 जणांच्या संघामध्ये बलवंत सिंग, मोहम्मद रफीक आणि लिंगडोह या अनुभवी फुटबॉलपटूंचा समावेश केला आहे. लालपेखलुआ हा अनुभवी फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. यापूर्वी तो सहा वर्षे चेन्नयीन एफसी संघाकडून खेळत होता. दोनवेळा चेन्नयीन एफसीने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. काही महिन्यापूर्वी 29 वर्षीय लालपेखलुआवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीतून तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. 33 वर्षीय बलवंत सिंगने गेल्या दोन हंगामात एटीके संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. नारायण दास याने गेल्या हंगामात ओडिशा एफसी संघाकडून 18 सामन्यांत सहभाग दर्शविला होता.
इस्ट बंगाल संघ- गोलरक्षक- एस रॉय, डी. मुझुमदार, मोहम्मद रफीक अली सरदार, के. मिरशाद, बचावफळी- गुरूतेज सिंग, नारायण दास, समद अली मलिक, लालरामचुलोव्हा, मोहम्मद इर्शाद, रोहेन सिंग, अभिषेक आंबेकर, राणा घरमी, मध्यफळी-सेहनाज सिंग, विकास जेरू, लिंगडोह, गोपी सिंग, के. वेंगबाम, मोहम्मद रफीक, एम.मेताई, सुचेंद्र सिंग, आघाडी फळी- जेजे लालपेखलुआ आणि बलवंत सिंग.