ऑनलाईन टीम / तेल अवीव :
इस्राईलने कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अमेरिकेच्या फायझर कंपनीसोबत करार केला आहे. इस्त्राईलची राजधानी तेल अवीवपर्यंत या लसींचा पहिला लॉट दाखल झाला असून, 27 डिसेंबरपासून लसीकरणास सुरुवात होणार आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
नेतन्याहू म्हणाले, फायझर-बायोएनटेकची लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. ही लस व्यापक वापरासाठीही योग्य आहे. ब्रिटननंतर, कॅनडा, बहरिन आणि अमेरिकेने या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. त्यानंतर इस्त्राईलने देखील फायझरकडून पहिल्या लॉटमध्ये 80 लाख डोस ऑर्डर केले आहेत.
इस्राईलने लस ऑर्डर केली असली तरी देखील फायझरच्या लसीला इस्राईलमध्ये वापरण्यासाठी आवश्यक नियामक परवानग्या मिळालेल्या नाहीत. तथापि, देशव्यापी पातळीवर लसीकरणाचे धोरण तयार करण्यात येत असून, 27 डिसेंबरला लसीकरणाला सुरुवात होईल.