नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेला इस्रायलने सक्रीय पाठिंबा घोषित केला आहे. भारताने नुकतीच एका इस्रायली कंपनीला भारतात इलेक्ट्रॉनिक्स साधनांचे उत्पादन करण्यास अनुमती दिली आहे. यासंबंधी त्या देशाने समाधान व्यक्त केले असून उत्तरोत्तर भारत आणि इस्रायल यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढत जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांनी भारतात आपली उत्पादनकेंद्रे स्थापन करावीत, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतात तंत्रज्ञानाचा विकास व्हावा, तसेच संरक्षण व इतर क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा, असाही सरकारचा मानस आहे.
विदेशी तंत्रज्ञान आणि देशात विकसीत करण्यात आलेले तंत्रज्ञान यांच्यात समन्वय राखून भारताने प्रगती करण्याची आवश्यकता आहे. जागतिक आव्हानांचा विचार करता पूर्णपणे विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे भारताला परवडणार नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्याला अनुसरून आत्मनिर्भर भारत ही योजना क्रियान्वित करण्यात आली आहे.
इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मलका यांनी आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन्ही योजनांना आपल्या सरकारचा पाठिंबा असल्याचे येथे एका कार्यक्रमात स्पष्ट केले. या दोन्ही योजना भारताला स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणार आहेत. भारताने इस्रायलच्या ‘निओलिंक’ या कंपनीला भारतात उत्पादन करण्याची अनुमती देऊन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी भारतात रोजगार निर्माण करेल आणि नवे तंत्रज्ञान देशात आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.