सौदी राजदूताला भेटले इम्रान खान
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे सरकार इस्रायलला मान्यता देणार नसल्याचा दावा विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केला आहे. पाकिस्तानसाठी पॅलेस्टाईनचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम तो सोडवावा लागणार असल्याचे कुरैशी यांनी म्हटले आहे. तर सौदी अरेबियाच्या कर्जाचे दोन हप्ते फेडल्यावर पंतप्रधान इम्रान खान त्याच्या राजदूताची भेट घेतली आहे.
विदेशमंत्री कुरैशी मागील आठवडय़ात संयुक्त अरब अमिरातच्या दौऱयावर गेले होते. युएईने दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नागरिकांना कुठल्याही प्रकारचा व्हिसा देण्याची प्रक्रिया रोखली आहे. युएईने इस्रायलला मान्यता दिली आहे. पाकिस्तानी नागरिकांवरील व्हिसाबंदी मागे घ्यावी, अशी विनंती कुरैशी यांनी केली होती. परंतु युएई सरकारने ही विनंती धुडकावून लावली आहे. तर युएई आणि सौदी अरेबिया इस्रायलला मान्यता देण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकत असल्याचे वृत्त आहे.
इस्रायलवर ठाम
पॅलेस्टाईनचा मुद्दा निकालात निघेपर्यंत इस्रायलला मान्यता देणार नसल्याचे युएई सरकारसमोर स्पष्ट केले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन विषयीच्या धोरणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचे विदेशमंत्री कुरैशी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनाच खोटे ठरविले
इस्रायलला मान्यता देण्यासाठी अमेरिकेसह आणखी एका देशाचा दबाव असल्याचे इम्रान यांनी म्हटले होते. परंतु कुरैशी यांनी पंतप्रधानांनाच खोटे ठरविले आहे. इस्रायल प्रकरणी दबाव नसल्याचे कुरैशी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान दडपणात
कर्जाच्या परतफेडीसाठी सौदी अरेबिया सातत्याने पाकिस्तानवर दबाव टाकत आहे. इम्रान सरकारने दोनवेळा 2 अब्ज डॉलर्स चीनकडून कर्जाच्या स्वरुपात घेत सौदी अरेबियाच्या कर्जाचे दोन हप्ते फेडले आहेत. तिसरा हप्ता जानेवारीत द्यावा लागणार आहे. याचदरम्यान सौदी राजदूताने इम्रान यांची भेट घेतली आहे. इराण आणि तुर्कस्तान सोबतचे संबंध तोडावेत याकरता सौदी अरेबिया पाकिस्तानवर दबाव आणत असल्याचे वृत्त आहे. याचबरोबर इस्रायलला मान्यता देण्याचाही दबाव पाकिस्तानवर आहे.