ऐतिहासिक करार : आणखीन 5 किंवा 6 अरब देश सामील होणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इस्रायलने संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनसोबत ऐतिहासिक करार केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या आहेत. अरब देशांसोबत आता इस्रायलचे औपचारिक राजनयिक संबंध सुरू होणार आहेत. अमेरिकेने या करारात सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
ही एक नवी आणि उत्तम सुरुवात आहे. लवरच 5 किंवा 6 अरब देशही याप्रकारचा करार करतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी हा उल्लेख सौदी अरेबिया आणि ओमानसाठी केल्याचे मानले जात आहे.
मध्यपूर्वेत नवी सुरुवात
अरब देश आणि इस्रायल यांचे संबंध अनेक दशकांपर्यंत अत्यंत खराब राहिले आहेत. दोघेही परस्परांना धोका मानत आले आहेत. कुटनीतिक स्वरुपातही शत्रूदेशाचा दर्जा देण्यात आला होता. परंतु आता ट्रम्प यांचे प्रयत्न फलनिष्पत्ती करणारे ठरले आहेत. मागील महिन्यात इस्रायल आणि युएई यांच्यात शांतता करार झाला होता. आता यात बहारीनही जोडला गेला आहे. मंगळवारी झालेल्या करारात तिन्ही देशांदरम्यान राजनयिक संबंध प्रस्थापित करण्याचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.
कराराचा अन्वयार्थ
पुढील महिन्यापर्यंत कराराच्या अंमलबजावणीचा आराखडा तयार होणार आहे. याचबरोबर तिन्ही देश राजदूत आणि उर्वरित कर्मचाऱयांची नावे निश्चित करणार आहेत. ही यादी परस्परांना पाठविली जाणार आहे. विदेश मंत्रालयाच्या मंजुरीनंतर राजनयिक कामकाज सुरू होईल. तिन्ही देश परस्परांच्या क्षेत्रात व्यवसाय करू शकणार आहेत. इस्रायलला मोठय़ा बाजारपेठेची गरज असून मध्यपूर्वेतील देशांना तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.
ट्रम्प यांचा संकेत
करारानंतर ट्रम्प यांनी दिलेले संकेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. लवकरच 5 किंवा 6 अरब देश इस्रायलसोबत अशाप्रकारचा करार करतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका आता सौदी अरेबिया आणि ओमानच्या संपर्कात आहे. लवकरच हे दोन्ही देश इस्रायलसोबत राजनयिक संबंध प्रस्थापित करू शकतात. तुर्कस्तान आणि पाकिस्तान या कराराच्या विरोधात आहेत.