अमेरिकेच्या अध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा : जेरूसलेमसमवेत अनेक शहरांमध्ये दंगली सुरू
वृत्तसंस्था / जेरूसलेम
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात (स्मॉल स्केल वॉर) आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 65 जण पॅलेस्टिनी आहेत. गाझा पट्टी भागातून हमासकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या 7 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील हमासचा कमांडर बसीम ईसा मारला गेला आहे.
मृत्युमुखी पडलेल्या 65 जणांमध्ये 16 मुले आणि 5 महिलांचा समावेश आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 365 पॅलेस्टिनी जखमी झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हमासने आतापर्यंत इस्रायलच्या दिशेने दीड हजारांहून अधिक रॉकेट्स डागली आहेत. या संघर्षात आता अमेरिकेची एंट्री झाली आहे. अमेरिकेने इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या नेत्यांशी चर्चा करून संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले आहे. तर इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये दंगली सुरू झाल्या आहेत.
हमासने बुधवारी रात्री पुन्हा इस्रायलवर रॉकेटने हल्ले केले आहेत. बुधवार रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत 180 रॉकेट्स डागल्याचा दावा हमासने केला आहे. गाझापट्टीमधून डागण्यात आलेला एक रॉकेट तेल अवीव शहरातील नागरी वस्तीत कोसळला आहे. या रॉकेट हल्ल्यात 5 वर्षीय मुलगा आणि त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या वायुदलाने गाझापट्टीवर हमासच्या 500 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
लॉड शहरात आणीबाणी
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर अनेक शहरांमध्ये ज्यू आणि अरबी वंशीय लोकांदरम्यान दंगली सुरू झाल्या आहेत. दंगलीची सर्वाधिक प्रकरणे जेरूसलेम, लॉड, हाइफा आणि सखनिन शहरात दिसून आली आहेत. स्थिती बिघडल्याने लॉड शहरात आणीबाणी लागू करावी लागली आहे. 1966 नंतर पहिल्यांदाच दंगलीमुळे येथे आणीबाणी लागू करण्याची वेळ आली आहे. दंगलींमध्ये 36 पोलीस जखमी झाले आहेत. इस्रायलच्या पोलिसांनी दंगलीत सामील 374 जणांना अटक केली आहे. हमासच्या वरिष्ठ कमांडरने संघर्ष संपुष्टात आणण्यावर सहमती दर्शविली असली तरीही इस्रायल सध्या यासाठी तयार नसल्याचे समजते.
इस्रायलला रक्षणाचा अधिकार
अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी रात्री इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. इस्रायलवर शेकडो रॉकेट हल्ले झाले असल्याने त्याला स्वतःच्या नागरिकांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. ही लढाई लवकरच संपुष्टात येईल अशी अपेक्षा असल्याचे बायडेन म्हणाले. बायडेन यांनी तेल अवीव आणि जेरूसलेम शहरावरील हमासच्या रॉकेट हल्ल्यांची निंदा केली आहे. इजिप्त, जॉर्डन, पॅलेस्टाईन आणि कतारसह अनेक आखाती देशांशी बायडेन संपर्कात आहेत, असे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले आहे.
पॅलेस्टाईनशी संपर्क
अमेरिकेचे विदेशमंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी गुरुवारी पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमू द अब्बास यांच्याशी चर्चा केली आहे. ब्लिंकेन यांनी जेरूसलेम, वेस्ट बँक आणि गाझामध्ये झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूवर संवेदना व्यक्त केली. तसेच हमासच्या रॉकेट हल्ल्यांना चुकीचे ठरवत लढाई संपुष्टात आणण्यासाठी चर्चा केली आहे.