प्रतिनिधी / इस्लामपूर
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हयातून चार चाकी वाहने चोरणाऱ्या तिघांच्या टोळीचा इस्लामपूर पोलीसांनी छडा लावला. यातील राजू बाबुराव जावळकर(५४,रा.खानापूर, ता.हवेली, जि पुणे) याच्या मुसक्या आवळल्या. त्याने पाच गुन्हयांची कबुली दिली असून जावळकर याला न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली. दरम्यान पोलीसांनी दोन चारचाकी वाहने हस्तगत केली आहेत.
नितिन शामराव समुद्रे (रा.वाकड, पुणे),व अंगत पुणवत यादव (रा.अहमदनगर) अशी अन्य दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांचा शोध सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्लामपूर व परिसरात चारचाकी बोलोरोसह अन्य वाहने चोरीचे प्रमाण वाढले आहे. दि. ३१ जानेवारी २०२२ रोजी आष्टानाका परिसरातील भास्कर मोरे यांच्या माणकेश्वर मोटार गॅरेज मध्ये लावलेली. चारचाकी बोलोरो चोरटयांनी लांबवली. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी या गुन्हयाचा छडा लावण्यासाठी पथकाची नियुक्ती केली. यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी प्रविण साळुखे, हवलदार दिपक ठोंबरे, पोलीस नाईक अरुण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आलमगीर लतिफ यांचा सहभाग होता.
या पथकाने इस्लामपूर शहरातील सीसीटिव्हीची सखोल पहाणी केली. त्यामध्ये आरोपी ही बोलोरो घेवून पेठच्या दिशेने गेल्याचे समजून आले. पोलीसांनी तपासाचा पाठलाग पुणे जिल्हयातील खेडशिवापूर पर्यंत केला. इस्लामपूर पोलीसांनी ठिकठिकाणची सीसीटिव्ही फुटेज तपासली. हा माग खेड-शिवापूरपर्यंत लागल्याने पोलीसांनी एक दिवस तिथे मुक्काम ठोकला. रामनगर परिसरात जावळकर हा आरोपी हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने कोल्हापूर जिल्हयातील गांधीनगर, सांगली शहर, सातारा शहर, इस्लामपूर येथील पाच गुन्हयांची कबुली दिली. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाईत खेड-शिवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त कॅप्टन गुंडेवाड तसेच पोलीस चौकीचे हवलदार संतोष तोडकर यांची ही मदत झाली.