जगभरात 63,94,316 जणांना कोरोनाची बाधा : 3,77,966 जणांचा बळी, युरोपमध्ये संकट ओसरले
जगभरात आतापर्यंत 63 लाख 94 हजार 316 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 77 हजार 966 जणांना या महामारीमुळे जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत 29 लाख 26 हजार 855 बाधितांनी संसर्गापासून मुक्ती मिळविली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मुखपट्टा परिधान करणाऱया व्यक्तीला 3 हजार पाकिस्तानी रुपयांचा (भारतीय चलनात सुमारे 1400 रुपये) दंड ठोठावला जाणार आहे. पाकमध्ये संसर्ग गतिमान झाला आहे.
डब्ल्यूएचओचे अमेरिकेला आवाहन
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रियसियस यांनी अमेरिकेला संबंध संपुष्टात न आणण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेने सोबत राहून काम केल्यास तेथील लोकांना लाभ होणार आहे. अनेक दशकांपासून अमेरिकेने संघटनेत सक्रीय भूमिका बजावली आहे. अमेरिकेकडूनच सर्वाधिक मदत मिळाली असून याचा लाभ पूर्ण जगाला झाला आहे. अमेरिकेने संबंध न संपविता ते अधिक बळकट करावेत, असे टेड्रोस म्हणाले.
स्पेन : दिलासादायक वृत्त
स्पेनमध्ये रविवारी एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. दिवसभरात एकही बळी न जाणे यापेक्षा अधिक सकारात्मक चिन्ह कुठले असू शकते? आमच्या पथकाने दिवसरात्र मेहनत केली असून आता याचे परिणाम दिसून येत असल्याचे उद्गार हेल्थ इमर्जन्सीचे महासंचालक फर्नांडो सिमॉन यांनी काढले आहेत.
फौसी अन् ट्रम्प मतभेद?
अमेरिकन नॅशनल हेल्थ इन्स्टीटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजचे संचालक आणि कोरोना विरोधी कृतिदलाचे सदस्य डॉक्टर अँथोनी फौसी सध्या पत्रकार परिषदांमध्ये दिसून येत नाहीत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फौसी यांच्यातील मतभेद तीव्र झाल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. फौसी आणि ट्रम्प यांच्यात दोन आठवडय़ांपासून कुठलीच भेट किंवा चर्चा झालेली नाही. दोघांची अखेरची भेट 18 मे रोजी झाली होती. तर कृतिदलाची अंतिम बैठक 28 मे रोजी झाली होती. या बैठकीत ट्रम्प सामील झाले नव्हते.
न्यूझीलंड : नवा रुग्ण नाही
संसर्ग फैलावण्यापासून रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवडय़ात हटविले जाऊ शकतात. न्यूझीलंडमध्ये पहिल्या क्रमांकाची इशारा पातळी राहणार आहे. तसेच लोकांच्या एकत्र येण्यावरील बंदी हटविण्यात येईल. देशाच्या सीमा तूर्तास बंद ठेवण्यात येणार असल्याचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयानुसार सलग 11 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी देशात नवा रुग्ण आढळलेला नाही. देशात आतापर्यंत 1,154 रुग्ण सापडले आहेत.
बेलारुस : हजारो मुलांना बाधा पण…
बेलारुसमध्ये 3,600 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 95 मुलांमध्ये कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. देशातील बाधितांचा एकूण आकडा 43,403 झाला असून 240 जणांचा मृत्यू झाला आहे. बेलारुसचे सरकार संसर्ग वाढून देखील गंभीर नसल्याची टीका जागतिक आरोग्य संघटनेने केली होती. देशात नागरिकांना मुखपट्टा आणि सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला देखील देण्यात आला नव्हता.
इटलीत नवा ऍप
इटलीत नवा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ऍप सादर करण्यात आला असून त्याला सरकारने मंजुरी दिली आहे. इम्यूनि असे नाव या ऍपला देण्यात आला आहे. लवकरच या ऍपचा वापर कायदेशीरदृष्टय़ा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. हा ऍप ऍपल किंवा गुगल स्टोअरमधून डाउनलोड करता येतो.
ब्राझील : स्थिती बिकट
ब्राझीलमध्ये 24 तासांत 12 हजार 247 नवे बाधित सापडले आहेत. तर 623 जणांना जीव गमवावा लागला आहे. मे महिन्यात देशात नव्या रुग्णांचे प्रमाण 5 पटीने वाढले आहे. आतापर्यंत एकूण 30,046 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलच सर्वाधिक पीडित देश ठरला आहे.
निर्बंध हटले, रुग्ण वाढले
इस्रायलमध्ये टाळेबंदी हटविण्यात आल्याच्या 24 तासांमध्ये 100 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधितांचा आकडा 17 हजार 619 वर पोहोचला आहे. देशात सध्या 2006 ऍक्टिव्ह केस आहेत. यातील 32 आयसीयूत दाखल आहेत. तर बळींचा आकडा 285 राहिला आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी बाधित असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.