चार जखमी, चारवर्षीय बालिकेची स्थिती गंभीर
सरवडे प्रतिनिधी
कागल तालुक्यतील उंदरवाडी – सरवडे दरम्यान मुख्य रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकीने दोन मोटरसायकलना धडक दिली. यामध्ये मोटरसायकलवरील चारजण जखमी झाले असून त्यातील चारवर्षीय बालिकेची स्थिती गंभीर आहे. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोल्हापुरात पाठवण्यात आले. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी कणेरी ( ता.करवीर ) येथील चारचाकी ( क्र. एमएच ०६ ए डब्ल्यू ६६०२ ) चालक सरवडेकडून मुधाळ तिट्टयाकडे चालला होता. सरवडे – उंदरवाडी दरम्यान असलेल्या ओढ्यानजिक चालकाचा ताबा सुटल्याने मुधाळ तिटट्याकडून सरवडेकडे चाललेल्या दोन मोटरसायकलना जोराची धडक दिली. त्यानंतर चारचाकी गाडी तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला धडकून थांबली .
या धडकेत स्प्लेंडर ( क्र. एमएच ०९ एजे ४७६२ ) गाडीवरील आटेगाव ( ता. राधानगरी ) येथील प्रकाश शिवाजी कांबळे व त्यांची मुलगी अन्वीता ( वय ४ वर्षे ) हे जखमी झाले. तर पॅशन ( क्र. एमएच ०९ सीएन ५४१९ ) गाडीवरील नाधवडे ( ता. भुदरगड ) येथील जयवंत गणपती पाटील ( वय २५ ) व त्यांच्या चुलती छाया तानाजी पाटील ( वय ४५ ) हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान जखमीपैकी अन्वीता कांबळे या चारवर्षीय बालिकेची स्थिती गंभीर असल्याचे समजते. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळाचा पंचनामा मुरगूड पोलिसांनी केला असून अधिक तपास पोलिस करत आहेत .