ऑनलाईन टीम / बीजिंग :
उइगर मुस्लिमांच्या अवयवांची तस्करी करुन चीनने अब्जावधी रुपयांची कमाई केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. हेराल्ड सन या वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार चीनमध्ये जवळपास दीड लाख लोकांना जबरदस्तीने तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्यांच्या तुरुंगवासाच्या काळात मूत्रपिंड आणि यकृत यांसारखे महत्त्वाचे शारीरिक अवयव जबरदस्तीने काढून काळ्या बाजारात विकले जात आहेत.
उइगर मुस्लिम स्वत:चा स्वतंत्र देश स्थापन करु पाहात आहेत. त्यामुळे चीनकडून उइगर मुस्लिमांचा छळ सुरू आहे. त्यांची सांस्कृतिक ओळख नष्ट करण्यासाठी चीन सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहे. शिंजियांगमध्ये मोठय़ा संख्यने मुस्लिमांना डिंटेशन सेंटरमध्ये नजरकैद करुन ठेवले आहे. दरम्यान, मेलबर्नमधील मॉर्निंग टॅब्लॉईड या वृत्तपत्रातील एका रिपोर्टमध्ये याबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. डांबून ठेवलेल्या उइगर मुस्लिमांच्या एका कार्यक्षम लिव्हरची विक्री करुन चीन जवळपास 1 कोटी 20 लाख रुपयांची कमाई करतो. या व्यापारात चीनला दरवषी 75 अब्ज रुपयांची कमाई होते. यापूर्वीही चीनवर अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने (यूएनएचआरसी) म्हटले होते की, उइगर, तिबेटी, मुस्लिम आणि ख्रिश्चनांसह अल्पसंख्याकांच्या अवयवांच्या तस्करीबद्दल मानवाधिकार तज्ञांना तीव्र चिंता आहे.