प्रतिनिधी /बेळगाव
चन्नम्मानगर फर्स्ट स्टेज येथील स्टेट बँक कॉलनी जवळ पोस्ट कार्यालयाकडे वळणाऱया मुख्य रस्त्यावर वीजवाहिनीसाठी लोखंडी पाईप घालण्यात आली आहे. मात्र, सदर पाईप उघडय़ावर असल्याने पादचारी आणि वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. धोकादायक पाईपवर पूर्णपणे डांबर घालण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
भूमिगत विद्युत वाहिन्या घालताना ठिकठिकाणी लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला आहे. मात्र, सदर पाईप पूर्णपणे बुजविण्यात आली नसल्याने अर्धी उघडय़ावर आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या उघडय़ा पाईपमुळे पादचारी आणि दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. वाहने वळविताना टायर घसरून अपघात घडत आहेत. शहरात अशा प्रकारच्या पाईप अनेक ठिकाणी असून, याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास होत आहे, ही बाब चांगली आहे. पण कामाचा दर्जा आणि नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पण याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी या उघडय़ा पाईपचा धोका पादचाऱयांना होत आहे.
पायी चालत जाताना उघडय़ा पाईपमुळे अडखळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. जवळच बसथांबा असल्याने नागरिक बसमध्ये बसण्यासाठी घाईगडबडीने जात असतात. अशावेळी पाय अडकून पडत आहेत. विशेषतः वृद्धांना याचा अधिक धोका आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱयांनी उघडय़ा असलेल्या पाईपचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.