कृषी केंद्रावरील पत्रे उडाले : वीजखांब मोडून, वृक्ष उन्मळून नुकसान
वार्ताहर/ उचगाव
उचगाव परिसरामध्ये सलग दुसऱया दिवशीही शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सोसाटय़ाच्या जोरदार वाऱयाने आणि पावसाने रुद्रावतार धारण केल्याचे चित्र दिसून आले. अनेक वृक्ष उन्मळून पडले, विद्युतखांब मोडून पडले. उचगाव कृषी केंद्रावरील पत्रे जवळपास 400 फूट अंतरावर उडून पडले. आंबेडकरनगर, उचगाव येथील राहत्या घरावर निलगिरीचे भले मोठे झाड कोसळल्याने घरच जमीनदोस्त झाल्याने सदर कुटुंब रस्त्यावर आले आहे.
शनिवारी दुपारी वाऱयाचा इतका वेग होता की 400 ते 500 फुटांपर्यंत अनेक घरांवरील पत्रे उडून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मळेकरणी हायस्कूल समोरील दोन मोठे वृक्ष उन्मळून पडले. आंबेडकरनगर येथील सिद्राय कांबळे यांच्या राहत्या घरावर निलगिरीचा मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले. उचगावमधील कृषी कार्यालयांवरील पत्रे चारशे फूट अंतरावर वाऱयाच्या जोरदार तडाख्याने उडून गेले. सदर पत्रे निंगाप्पा जाधव यांच्या घरावर जाऊन पडले. उचगाव-कोवाड मार्गावरील उचगाव ऍप्रोच रोडवर दोन ठिकाणी भले मोठे दोन वृक्ष उन्मळून पडले. यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वीजतारा आणि खांब मोडून पडले. याबरोबरच बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील सुळगे हनुमान मंदिराजवळ दोन मोठे वृक्ष कोसळल्याने सदर रस्ता बराच वेळ वाहतुकीसाठी बंद होता. नागरिकांनी मशीनच्या साहाय्याने सदर वृक्ष कापल्यानंतर रस्ता वाहतुकीला खुला करून दिला. झाडांच्या फांद्या मोडून अनेक घरांवर पडल्याने किरकोळ नुकसान झाले आहे.