ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशात पत्रकार आणि त्याच्या मित्राची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी सॅनिटायजरने पत्रकाराचे घर पेटवून दिले होते. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला. बलरामपूरचे पोलीस अधिक्षक देवरंजन वर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पत्रकार राकेश सिंग (वय 35) आणि त्यांचा मित्र पिंटू राहू अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर ललित मिश्रा, केशवानंद मिश्रा उर्फ रिंकू आणि अक्रम अली अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी केशवानंद याची आई बलरामपूरची प्रमुख होती. त्यावेळी झालेले प्रशासकीय घोटाळे पत्रकार राकेश सिंगने उघड केले होते. त्याचा राग केशवानंदच्या मनात होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपीने साथीदारांच्या मदतीने राकेशला दारू पाजली. त्यानंतर सॅनिटायजर ओतून घर पेटवून दिले. आगीत दोघेही गंभीररीत्या भाजले होते. राकेशचा मित्र पिंटू राहू याचा जागीच मृत्यू झाला. तर राकेशचा लखनऊ येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.