ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीतील ईसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 13 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूर खेरीतील पकरिया गावात मुलीचे कुटुंब राहते. मुलगी शौचासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान, एका उसाच्या शेतात पीडितेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.
मुलीवर दोन तरूणांनी बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. बलात्कारानंतर या तरुणांनी पीडितेच्या गळ्याला फास लावून शेतात ओढत नेले. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे पीडितेचे डोळे फोडण्यात आले, तिची जीभही कापण्यात आली. तसेच तिच्या शरीराचे इतर भागही कापण्यात आले. त्यानंतर आरोपींनी शेतात मृतदेह सोडून पळ काढला. ईसापूर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.