वृत्तसंस्था / मुंबई
भारताचा माजी सलामीचा फलंदाज तसेच मुंबई रणजी संघातील अनुभवी क्रिकेटपटू वासिम जाफर याची 2020-21 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामासाठी उत्तराखंड संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंड क्रिकेट संघटनेने वासिम जाफरबरोबर वर्षांच्या कालावधीसाठी हा करार केला आहे.
रणजी क्रिकेट स्पर्धेत वासिम जाफरने सर्वाधिक धावा नोंदविण्याचा विक्रम केला आहे. तब्बल दोन दशके क्रिकेट क्षेत्रात वावरल्यानंतर वासिम जाफरने गेल्या मार्चमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. वासिम जाफरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 31 कसोटी आणि दोन वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2018-19 रणजी क्रिकेट हंगामात उत्तराखंड संघाने पदार्पण करताना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.