क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य अबकारी खाते व उतर कर्नाटक अबकारी खात्याच्या संयुक्त विद्यमाने उत्तर कर्नाटक अधिकारी विभागिय क्रीडा स्पर्धाना मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ हे होते.
जिल्हा क्रीडांगणावरती आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेंगलोरचे अबकारी खात्याचे आयुक्त शेख तनवीर आसिफ, अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टीयोद्धे मुकुंद किल्लेकर, विभागीय आयुक्त बाळकृष्ण, विभागाय आयुक्त बसवराज हडपद, एस. एन. राजेंद्र प्रसाद, फिरोज किल्लेदार व जिह्याचे सहाय्यक आयुक्त व अधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत फिरोज किल्लेदार यांनी केले. क्रीडा ज्योत घेऊन आनंद अनगल, अशोक कुमार, श्रीनिवास व पुष्पा गडादी यांनी मैदानावरती क्रीडा ज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. त्यानंतर कबुतरे आकाशात सोडण्यात आली व रंगीत फुगे आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे आसिफ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त डी वाय मंजुनाथ, मुकुंद किल्लेकर, बाळकृष्ण, एस एम राजेंद्र प्रसाद व फिरोज किल्लेदार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. जगदीश इनामदार यांनी सर्व क्रीडापटूंना शपथ देवविली.
या स्पर्धेत ऍथलेटिक्स, मॅरेथॉन, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, कबड्डी, टगफॉर, क्रिकेट आदी खेळांचा समावेश आहे. व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन शेख तनवीर असिफ यांच्या हस्ते नेटवरील चेंडू सोडून करण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष विभागात बेळगाव संघाने गुलबर्गा ब संघाचा 2-1 अशा तर दुसऱया सामन्यात गुलबर्गाने हावेरी संघाचा 2-0 पराभव केला. महिलांच्या थ्रोबॉल स्पर्धेत बेळगाव गुलबर्गा संघाचा 2-0 असा पराभव केला.