प्रतिनिधी /पणजी :
पुढील सहा महिन्यात गोव्यातील सहकार व कृषी क्षेत्रात उत्तर प्रदेश सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून उत्तर प्रदेश आणि गोवा यांच्या दरम्यान परस्पर व्यापार संबंध अधिक दृढ करणार, अशी माहिती उत्तर प्रदेशचे सहकार राज्यमंत्री डॉ. सुनिल सिंग यांनी दिली.
डॉ. सुनिल सिंग हे गेले आठ दिवस गोव्यात असून त्यांनी गोव्यातील विविध सहकार संस्थांमध्ये जाऊन अभ्यास केला. उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य आणि गोवा हे सर्वात छोटे राज्य असले तरी गोव्याने सहकार क्षेत्रात फार मोठी भरारी घेतल्याचे ते म्हणाले.
सहकार क्षेत्रात गोव्याची मोठी कामगीरी
सहकार क्षेत्रात गोवा एवढय़ा प्रगतीपथावर आहे की, देशात गोव्याचा तिसरा क्रमांक लागतो. गोव्याने गुजरातलादेखील मागे टाकलेले आहे. सध्या देशात राजस्थान सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे. द्वितीय स्थानी महाराष्ट्र आहे. तृतीय स्थानावर गोवा, चौथ्या स्थानावर गुजरात आणि जे 25 व्या स्थानावर होते ते आमचे उत्तरप्रदेश हे राज्य आज सातव्या स्थानावर पोहोचलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
गोव्यातील सहकारी संस्थांचा अभ्यास
मूळ प्राध्यापक असलेले डॉ. सुनिल सिंग हे सध्या उत्तरप्रदेश सरकारमध्ये सहकार आणि ग्राहक चळवळ या विभागाचे राज्यमंत्री आहेत. ते म्हणाले की आपण गेले आठ दिवस गोव्यात वास्तव्य करुन आहे. माजीमंत्री प्रकाश वेळीप यांच्या केपे येथील आदर्श सहकारी संस्थेत जाऊन आलो. गोवा डेअरीमध्ये जाऊन आलो. गोवा बागायतदार या संस्थेचाही आपण अभ्यास केला. गोवा राज्य सहकारी बँक तसेच गोवा मार्केटिंग फेडरेशन या ठिकाणी जाऊनही आपण अभ्यास केला. याशिवाय काही पेडिट सोसायटय़ांमध्ये जाऊन आलो. तेथील ग्राहकांशी तसेच संचालकांशी देखील बोललो.
उत्तर प्रदेश बाळगणार गोव्याचा आदर्श
गोव्याने सहकार क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षात केलेली प्रगती अत्यंत नेत्रदीपक आहे. सहकार क्षेत्रातून राज्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार प्राप्त झालेला आहे. उत्तरप्रदेशमध्ये त्या तुलनेत सहकार क्षेत्र फार फोफावलेले नव्हते. त्यामुळे हे राज्य 25 व्या स्थानावर हेते मात्र आता प्रगतीपथावर असून आता आमचे राज्य गेल्या दोन वर्षात सातव्या स्थानावर पोहोचलेले आहे. आपण गोव्यात राहून सहकार क्षेत्राचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. गोव्याने जशी या क्षेत्रात प्रगती करुन आज राष्ट्रीय स्तरावर गोवा तिसऱया क्रमांकावर पोहोचलेला आहे, आम्हाला देखील गोव्याचा आदर्श उत्तरप्रदेश मध्ये न्यावयाचा आहे. तेथील सहकार क्षेत्र बरेच पुढे न्यावयाचे असल्याचे डॉ. सुनिल सिंग म्हणाले.