विविध स्टॉल्सची मांडणी : ऑनलाईन-ऑफलाईन स्पर्धांचेही आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
उत्सव सखी आयोजित ‘फेम फिएस्टा’ उत्सव यंदा दि. 5 ते 6 फेब्रुवारीला मराठा मंदिर येथे होणार आहे. कोरोनामुळे जवळजवळ वर्षभर ठप्प झालेले विविध कार्यक्रम आता सुरू झाले आहेत. महिलांना एकत्र येण्याची, खरेदीची, कलागुण सादरीकरणाची संधी उत्सव सखी देत आहे. यानिमित्त विविध स्टॉल्स मांडण्यात येणार असून ऑनलाईन व ऑफलाईन विविध स्पर्धाही आयोजित करण्यात येत आहेत. त्या पुढीलप्रमाणे…
पाककला स्पर्धा ः हेल्थी व्हेज सूप, डेकोरेटेड कप केक्स. पदार्थ घरातून करून दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता मराठा मंदिर येथे आणून ठेवावेत. स्पर्धक एक किंवा दोन्ही पदार्थ आणू शकतात. मांडणीसाठी 15 मिनिटे दिली जातील. अधिक महितीसाठी कोमल मुलानी 8867292779 या क्रमांकावर संपर्क साधावा.
मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ः दिलेले चित्र कोणत्याही रंगात रंगविणे, वेळ 45 मिनिटे, 4 थी ते 10 वी चे विद्यार्थी भाग घेऊ शकतील. 4 थी ते 6 वी व 7 वी ते 10 वी असे दोन गट करण्यात आले आहेत. स्पर्धकांनी साहित्य आणावयाचे असून वेळ 45 मिनिटे आहे. अधिक माहितीसाठी डॉ. अनुपमा जोशी यांच्याशी 9480787820 या क्रमांकावर संपर्क साधावा.
उत्सवादरम्यान बेळगाव, हुबळी, धारवाड, इचलकरंजी, गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, चेन्नई, गोवा व अहमदाबाद येथील स्टॉलधारक सहभागी होणार आहेत. यामध्ये साडय़ा, आभुषणे, डेस मटेरिअल, डिझाईनर साडी, सौंदर्य प्रसाधने, तयार पोषाख, गृह सजावटीच्या वस्तू, आर्टवर्क, शोभेची रोपे, फुले यांचे स्टॉल असणार आहेत. तसेच गुंतवणूक आणि शिक्षण या दोन विभागांचे वेगळे स्टॉल आहेत. शिवाय खवय्यांना तृप्त करणारे खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स आहेत. महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अनुपमा जोशी यांनी केले आहे.