प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी अनेक भागांमध्ये डेकोरेटिव्ह लाईट बसविण्यात आले होते. परंतु काही महिन्यांमध्येच हे लाईट बंद पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष नसल्याने मागील काही वर्षांपासून हे लाईट असून अडचण नसून खोळंबा ठरत आहेत. त्यामुळे हे डेकोरेटिव्ह लाईट केव्हा सुरू होणार, असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.
उद्यमबाग खानापूर रोडवर डेकोरेटिव्ह लाईट्स बसविण्यात आले होते. रस्ता रुंदीकरणानंतर हे लाईट बसवून सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचा होता. यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला. शहराच्या मोजक्मया भागात अशा प्रकारचे लाईट बसविण्यात आले. लाईट बसविले परंतु त्याची दुरुस्ती व देखभाल वेळच्या वेळी न केल्यामुळे हे डेकोरेटिव्ह लाईट सध्या बंद स्थितीत आहेत. यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेला. या लाईटची दुरुस्तीदेखील केली जात नसल्याने आता हे लाईट वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे उद्यमबाग रोडवरील या डेकोरेटिव्ह लाईटची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.