महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन : मोर्चा यशस्वी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी महापालिकेसमोर मुठभर कन्नडिगांनी बेकायदेशीर लाल-पिवळा झेंडा उभारला आहे. यामुळे सीमाभागातून संतापाची लाट उसळली आहे. लाल-पिवळा हटविण्यासाठी तसेच महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी गुरुवार दि. 21 रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती व तालुका म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हा मोर्चा निघणार आहे. सकाळी 10.30 वाजता सरदार्स हायस्कूल येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आल्यानंतर संगोळ्ळी रायण्णा मार्ग, आरटीओ सर्कलमार्गे जावून महानगरपालिकेसमोर मराठी अस्मितेचा भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे.
अत्यंत संयम आणि शांततेने हा मोर्चा काढायचा असून या मोर्चामध्ये आजी, माजी लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने भाग घ्यावा आणि हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीने केले आहे. अध्यक्ष निंगोजी हुद्दार, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस एल. आय. पाटील,
उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, खजिनदार एस. एल. चौगुले, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी केले आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीचेही आवाहन
महापालिकेसमोर अनधिकृतरित्या लावण्यात आलेला लाल-पिवळा ध्वज प्रशासनाने व पोलीस खात्याने काढावा आणि बेळगावात सलोखा राखावा, अशा आशयाचे निवेदन म. ए. समितीने जिल्हाधिकाऱयांना दिले होते. परंतु प्रशासनाने अद्याप तरी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे म. ए. समितीच्यावतीने गुरुवारी 21 जानेवारी रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चामध्ये नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.