महांतेशनगर परिसरातील उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्षः गवत-झाडाझुडुपांचे साम्राज्य
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध भागात महापालिका आणि बुडाच्यावतीने उद्याने निर्माण करण्यात आली आहेत. मात्र उद्यानांची देखभाल व्यवस्थित केली जात नाही. महांतेशनगर परिसरातील उद्यानांचा विकास तीन वर्षांपूर्वी केला होता. पण सदर उद्यानांची देखभाल करण्यात आली नसल्याने गवत व झुडुपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्यानांतील गवत व झाडेझुडुपे हटविण्यासाठी माजी नगरसेवक सरसावले आहेत.
शहर आणि उपनगरात उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. उद्यानांच्या विकासासाठी कोटय़वधी निधी खर्ची घालून विविध विकासकामे राबविण्यात येतात. काही ठिकाणी उद्यानांमध्ये खेळाचे साहित्य, वॉकिंगसाठी पेव्हर्स आणि विविध प्रकारची झाडे लावली आहेत. संपूर्ण उद्यानांचा विकास करून नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येतात. मात्र बहुतांश उद्यानांचा विकास झाल्यानंतर देखभाल केली जात नाही. परिणामी उद्यानांतील साहित्यांची मोडतोड झाली असून काही ठिकाणी गवत वाढल्याने निर्माण करण्यात आलेले वॉकिंग ट्रक गायब झाले आहेत.
महांतेशनगर परिसरातील उद्यानांचा विकास करण्यात आला. मात्र त्यानंतर याकडे फिरकूनही पाहण्यात आले नाही. परिणामी उद्यानांची दुरवस्था झाली असून पहाटेच्यावेळी फिरणाऱया नागरिकांची गैरसोय झाली आहे. उद्यानात सर्वत्र गवत उगविल्याने वॉकिंग ट्रक व खेळाचे साहित्य हरवले आहे. त्यामुळे या उद्यानात सापाकिडय़ांचे वास्तव्य वाढले आहे. परिणामी नागरिकांना तसेच लहान मुलांना धोकादायक बनले आहे.
डॉ. दिनेश नाशीपुडी करताहेत यंत्राद्वारे उद्यानांची स्वच्छता
उद्यानांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेकडे सातत्याने करण्यात आली. पण महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे उद्यानांच्या देखभालीसाठी माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी सरसावले आहेत. सदर उद्यानांच्या स्वच्छतेचे काम सोमवारपासून हाती घेतले आहे. गवत कापण्याच्या यंत्राद्वारे उद्यानांची स्वच्छता करण्याचे काम स्वतः करीत आहेत.