वडगाव येथील घटना, शहापूर येथील तरुण ताब्यात
प्रतिनिधी /बेळगाव
उधारी साहित्य देण्यास नकार दिल्याने लक्ष्मीनगर, तिसरा क्रॉस-वडगाव येथील एका पानदुकानदाराचा चाकूने भोसकून भीषण खून करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून शहापूर पोलिसांनी भारतनगर, दुसरा क्रॉस-शहापूर येथील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
बाळकृष्ण नागेश शेट्टी (वय 50, मूळचा रा. कुंदापूर, जि. उडुपी, सध्या रा. लक्ष्मीनगर, तिसरा क्रॉस-वडगाव) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास बाळकृष्ण राहत असलेल्या घरात जाऊन त्यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात बाळकृष्ण यांचा मृत्यू झाला.
दत्तात्रय उर्फ दत्ता शिवानंद जंतीनकट्टी (वय 24, रा. भारतनगर-शहापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बाळकृष्ण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळय़ात पडला होता.
उपलब्ध माहितीनुसार बाळकृष्ण शेट्टी हे लक्ष्मीनगर परिसरात पानदुकान चालवित होते. त्यांच्या दुकानात दत्तात्रय उर्फ दत्ता हा वरचेवर जात होता. गुटखा व इतर साहित्य उधारी देण्यासाठी त्याचा तगादा असायचा. मात्र उधारी देण्यास नकार दिल्यामुळे उभयतांत वादावादीची घटना घडली होती.
मंगळवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास बाळकृष्ण हे आपल्या घरी होते. त्यावेळी संशयित आरोपी दत्ताही त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजा ठोठावून त्यांना घराबाहेर बोलाविले. तेथेही या दोघांमध्ये वादावादीचा प्रसंग घडला. बाळकृष्ण जिन्यावर उभे असताना त्यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. बाळकृष्ण यांच्या पोटावर, छातीवर व चेहऱयावर चाकूहल्ला करून दत्ताने तेथून पळ काढला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेले बाळकृष्ण हे आपले दुकान उत्तमपणे सांभाळत होते. कोणाशीही त्यांचे वैर नव्हते. केवळ उधारी दिली नाही म्हणून तरुणाने चाकूने वार करून त्यांचा खून केला आहे.