वेंगुर्ले /वार्ताहर-
वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात शिरोडा येथील औषधनिर्माण अधिकारी आठवडयातील दोन दिवस येणार तर तालुक्यातील शाळा तपासणी औषध निर्माण अधिकारी रुग्णालयात शाळा नियमित सुरू होईपर्यंत कार्यरत राहणार आहेत असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळविले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील अधिपरीचारिकांनी सोमवारपासून बाह्यरुग्ण तपासणी बंद न ठेवता ती सुरू ठेवली आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल मुळे यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे औषधनिर्माण अधिकारी हे पद रिक्त असल्याने अधिपरीचारीकां जवळ औषधनिर्माण अधिकारी यांचा कार्यभार दिलेला होता. परंतु ते काम करणे शक्य नसल्याने अधीपरीचारिकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. औषधनिर्माण अधिकारी दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली झालेली आहे, मात्र त्यांना अद्याप पर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. तरी त्यांना त्यांच्या पदावर तात्काळ रुजू करावेत अन्यथा सोमवार पासून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची सेवा करणे बंद होणार असल्याचे पत्र अधिपरीचारिकांनी आरोग्य संचालकांना व जिल्हा शल्यचिकित्सक यांना लेखी स्वरूपात दिले होते. त्यावर हा तोडगा तात्पुरत्या स्वरुपात काढण्यात आला आहे.