कोविडबाबत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता – पालकमंत्री
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ाचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा सकारात्मकदृष्टय़ा कमी होत आहे. दरम्यान, सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जिल्हा दौऱयावर येत असून काही महत्वाचे निर्णय यावेळी घेतले जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हय़ाचा पॉझिटिव्हीटी दर खाली येत असून पुढील आठ ते दहा दिवसांत तो पाच टक्क्यांच्या खाली येईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान 22 जूननंतर सावंतवाडी बाजारपेठ व्यापाऱयांचा विचार करून खुली करणार असल्याचा इशारा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. याबाबत प्रशासनाची भूमिका काय? या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्र्यांनी कोणीही लोकप्रतिनिधींनी या परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले. बाजारपेठांबाबतचा निर्णय हा यापूर्वीही व्यापारी संघटनेशी चर्चा करूनच घेण्यात आला होता. गर्दीमुळेच कोरोना वाढतो, हे खरे असल्याने बाजारपेठांमधून गर्दी होऊ नये यासाठी व्यापाऱयांनी आणखी काही दिवस संयम पाळावा. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या दोन डोसमधील अंतराप्रमाणे पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस वेळेवर मिळावा, यासाठी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले आहे. लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.