जिल्हय़ातील 471 ग्रामपंचायत निवडणुकीची मोर्चेबांधणी वेगात : कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच विविध राजकीय पक्षांमध्ये चुरस
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोना लॉकडाऊनची अनलॉककडे वाटचाल सुरू असताना जिल्ह्य़ातील मुदत संपुष्टात आलेल्या 471 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीचे साऱया राजकीय वर्तुळाला वेध लागले आहेत. या ग्रामपंचायतींचा सध्या प्रशासकाच्या हातात कारभार असल्याने या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचे ‘डॅशिंग’ उमेदवार आतापासूनच बाशिंग बांधून जोरदार तयारीला लागले आहेत.
शासनाने कोरोना कालावधीत निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर पुन्हा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. महिन्याभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम आखला जाणार असल्याचे संकेत आहेत.
अजूनही ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मात्र ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम प्रशासनस्तरावर यापूर्वीच जाहीर झालेला आहे. त्यावर कार्यवाहीही सुरू आहे.
रत्नागिरी जिह्यातील 471 ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकच कार्यरत आहे. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हातात असल्याने गावातील विकासकामांचा बोऱया उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे लवकरात-लवकर निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी गावपातळीवरून होऊ लागली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिह्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपा असे सारेच आतापासूनच मोर्चेबांधणीत गुंतल्याचे चित्र आहे. इच्छुकांनी निवडणुकांसाठी दंड थोपटले आहेत. त्यासाठी निवडणुकीत चुरस आणण्यासाठी राजकीय ‘डॅशिंग’ उमेदवार हेरले जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायती निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार आहे.
प्रशासक असलेल्या ग्रामपंचायती :
तालुका ग्रामपंचायती
- मंडणगड 15
- दापोली 53
- खेड 87
- चिपळूण 83
- गुहागर 29
- संगमेश्वर 77
- रत्नागिरी 53
- लांजा 23
- राजापूर 51