शिरोळ/प्रतिनिधी
उसने दिलेले सहा लाख रुपये वारंवार मागणी करूनही न दिल्याने बाळासाहेब व्यंकटराव जगदाळे (वय 65, रा. जगदाळे गल्ली, शिरोळ) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आज, बुधवार (दि1) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जगदाळे यांचे पुत्र अमरसिंग जगदाळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत बाळासाहेब व्यंकटराव जगदाळे यांच्याकडून संशयित आरोपी रियाज गुलाब शेख, फिरोज शेख व शकीला शेख (सर्व रा. दत्तनगर, शिरोळ) यांनी दीड वर्षापूर्वी सहा लाख रुपये हात उसने घेतले होते. वारंवार पैशाची मागणी करूनही पैसे न दिल्याने त्यांनी बुवाफन मंदिरासमोर असलेल्या रिकाम्या जागेत विष प्राशन करून आत्महत्या केली. संशयित आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
ही माहिती मिळताच संशयित आरोपी शेख हे कुटुंबासह फरारी झाले आहेत. संशयित आरोपी शेख यांच्याविरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार नवनाथ सुळ हे करीत आहेत.
बाळासाहेब जगदाळे हे दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले नातवंडे असा परिवार आहे.