नोकरीच्या अमिषाने उकळले 8 लाख रुपये
प्रतिनिधी / कोल्हापूर
नोकरी लावण्यासाठी दिलेले उसने पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्येतून मंगळवार पेठ येथील एका होतकरु तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. तुषार उदय रोडे (वय 28 रा. मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ) असे मृत तरुणाचे नांव आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीसांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱया सुलोचना वसंत सावंत (वय 54 रा. टिंबर मार्केट) या महिलेस अटक केली असून तिच्यावर फसवणूक व आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद मृत तुषारचे वडील उदय आनंदराव रोडे (वय 58) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उदय रोडे यांचा मंगळवार पेठेत गिरण व्यवसाय आहे. पत्नी, मुलगी, मुलगा तुषारसह उदय रोडे गिरणीच्या पिछाडीस असणाऱ्या घरामध्ये राहतात. मुलगा तुषार याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पुर्ण केला आहे. महापालिका आरोग्य विभागात नेमणूक असणाऱ्या सुलोचना सावंत या महिलेशी रोडे कुटूंबियांची ओळख होती. या ओळखीतून सुलोचना सावंत हिने तुषारला आपण महापालिकेमध्ये नोकरी लावू शकतो असे सांगितले.
तसेच या साठी पैसे द्यावे लागतील असे सांगून 2017 पासून 8 लाख रुपये घेतले होते. रोडे कुटूंबियांनी काबाडकष्ट करुन जमवलेले पै अन् पै एकुलत्या एक मुलासाठी सावंत यांना जमेल तसे दिले होते. 2019 पर्यंत तुषार व त्याच्या परिवाराने सुलोचना सावंत यांच्याकडे नोकरीबाबत पाठपुरावा केला. मात्र सुलोचना सावंत हिने चाल – ढकल केली. यानंतर तुषारने सुलोचना सावंत यांच्याकडे पैसे परत द्यावे अशी मागणी केली. काही रक्कम परत दिल्यानंतर उर्वरीत रक्कम देण्यास सावंत हिने टाळाटाळ केली. तसेच काही मध्यस्थांना घेवून रोडे कुटूंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्या मध्यस्थांनी रक्कम काही दिवसातच परत देण्याचे आश्वासनही दिले होते. दरम्यान 1 वर्ष पाठपुरावा करुनही सुलोचना सावंत हिने रक्कम परत दिली नसल्याने गेल्या काही दिवसांपासून तुषार नैराश्येत होता.
गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तुषार मोबाईल घेवून घराच्या टेरेसवर गेला. वहीवर एक चिठ्ठी लिहून ठेवली व त्या खाली स्वाक्षरी केली. यानंतर त्याने टेरेसच्या अँगला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री 7 वाजण्याच्या सुमारास वडील उदय रोडे वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना तुषार दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यामुळे धक्का बसलेल्या रोडे यांनी स्वतःला सावरत याची माहिती नातेवाईकांना व जुना राजवाडा पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेहाशेजारील चिठ्ठी जप्त केली. या चिठ्ठीवरुन रात्री उशिरा सुलोचना सावंत हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी सकाळी तिला अटक करण्यात आली. तिच्यावर फसवणूक व आत्महत्येस कारणीभूत या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंजना फाळके करत आहेत.
पैसे परत देत नाही… माझ्या मृत्यूस कारणीभूत
सुलोचना सावंत हिला मी नोकरीसाठी 2017 पासून 8 लाख रुपये दिले आहेत. मात्र वेळोवेळी मागणी करुनही मला पैसे परत मिळत नाही आहेत. यामुळे नैराश्येतून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस सुलोचना सावंत या महिलेस कारणीभूत समजून तिच्यावर कारवाई करावी अशा आशयाची चिठ्ठी तुषारने लिहली होती. मृतदेहा शेजारीच ही चिठ्ठी एका वहीच्या कागदावर लिहील्याचे दिसून आले.
नातेवाईक, मित्र परीवाराचा आक्रोश
मनमिळावू व शांत व संयमी स्वभावाच्या तुषार रोडे याने आत्महत्या केल्याची माहिती परिसरात समजल्यानंतर सिपीआर रुग्णालयात नातेवाईक व मित्र परीवाराने गर्दी केली होती. तुषारच्या मृत्यूचा धक्का आई, वडीलांना बसला त्यांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.