प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील बोंबले हनुमान भागातील एक 8 महिन्याची गरोदर महिलेचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने व ती महिला शहरातील चार रूग्णालयात उपचारासाठी फिरली असल्यामुळे शहरातील धोका यामुळे वाढला.
सदर महिलाची गरोदरपणाची नियमित तपासणी ही शहरातील डॉ. मिटकरी यांच्याकडे सुरू होती. महिलेचे वजन जास्त असल्याने व पायाला सूज येत असल्याने त्या महिलेस उपचारासाठी लातूर येथे पाठविले होते. मात्र त्यापूर्वी ही महिला डॉ. डंबळ, डॉ. स्वामी व सह्याद्री मल्टीस्पेशालिस्टी रूग्णालयात उपचारासाठी येवून गेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. ही महिला वरील चार रूग्णालयात किती वेळा गेली व किती वेळ थांबली होती व तिथे तिच्यावर काय उपचार केले यावर या रूग्णालयात कोणत्या प्रतिबंधारूत्मक उपाययोजना राबवायच्या यावर निर्णय होणार आहे. ही महिला सध्या लातूर येथे उपचार घेत असून तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सदर महिला ही शहरात अनेक ठिकाणी उपचार घेण्यासाठी गेल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. आतापर्यत उस्मानाबाद जिल्ह्यात रूग्णांची संख्या 139 झाली असून त्यातील 90 जण बरे झाले तर बाकी 46 जणांवर त्या त्या तालुक्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता शहरातील गरोदर मातांसह या वरील दवाखान्यात उपचार घेत असलेल्या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.