ग्राहकांसह कर्मचाऱयांच्या आरोग्यासाठी कंपनीचा निर्णय
नवी दिल्ली
जगभरात पुन्हा एकदा कोरोना आणि त्यातील नवीन प्रकार ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याच्या कारणास्तव विविध टप्प्यावरील आर्थिक घडामोडींवर परिणाम करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आयफोनची निर्मिती करणारी दिग्गज टेक कंपनी ऍपल यांच्याकडून न्यूयॉर्कमधील आपले सर्व स्टोअर ब्राउजिंगसाठी बंद करण्यात आल्याची माहिती सीएनएनकडून देण्यात आली आहे. मात्र ऑनलाईन ऑर्डर घेणे आणि जीनियस सपोर्टसारखी वॉक इन सर्व्हिस सुरु ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
कंपनीने आपल्या दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे, की आम्ही बाजारातील स्थितीवर नजर ठेऊन आहोत, तसेच आमच्या ग्राहक आणि कर्मचाऱयांना आरोग्याच्याबाबतीत हित लक्षात घेत हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने अमेरिकेतील आपल्या रिटेल स्टोअर्समध्ये सर्वांसाठी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.
विविध ठिकाणचा समावेश
कोरोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने फ्लोरिडा, मॅरीलँड आणि कॅनडामधीलही आपले स्टोअर्स बंद केले आहेत. न्यूयॉर्कमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याने यामध्ये ट्रान्सपोर्ट विभागाने चालू आठवडय़ात काही ट्रेन सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे