प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ई-कॉमर्स नियम लागू करावा’ अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने केली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले. ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या या ई-कॉमर्स कंपन्या भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत भारतामध्ये अनैतिक व्यापार करत आहेत. त्याविरोधात देशभरातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. देशातील सर्व व्यापारी संघटनांनी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शासकीय प्रतिनिधी जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदने देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गुरुवार 23 रोजी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
`देशात अनेक कायदे, नियम व धोरण अस्तित्वात असतानासुद्धा विदेशी ई-कॉमर्स कंपन्या कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. यावरती उच्च न्यायालय व अन्य न्यायालय यांनी तीव्र टिप्पण्या नोंदविलेल्या आहेत. तरी सुद्धा केंद्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. अमेझॉन व फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांची चौकशी पूर्ण होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत या कंपन्यांचे ई-पोर्टल, सर्व कागदपत्रे, कम्प्यूटर हार्ड डिस्क आणि संपूर्ण डेटा जप्त करावा. कारण हा सर्व डेटा नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, केंद्रशासनाने ई-कॉमर्स धोरण आणि एफडीआय धोरण, 2018 च्या प्रेस नोट क्रमांक 02 प्रमाणे अमेझॉन व फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यापारपद्धतीचा तपास जलदगतीने करून छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा.’ अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, संचालक राहूल नष्टे, प्रशांत शिंदे, संपत पाटील, अनिल धडाम, कॅटचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य विजय नारायणपूरे आदी उपस्थित होते.