वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या (एएफआय) वैद्यकीय आयोगाचे चेअरमन अरुणकुमार मेंदीरत्त यांचे शुक्रवारी वयाच्या 60 व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. आगामी टोकिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकासमवेत ते जाणार होते.
अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनतर्फे अरुणकुमार मेंदीरत्त यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जवळपास गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत अरुणकुमार मेंदीरत्त हे आशियाई ऍथलेटिक्स संघटनेबरोबर निगडीत होते. भारतीय क्रीडा क्षेत्रात डोपिंग आणि बनावट वयोगट दाखला प्रकरणाविरोध ते नेहमीच झगडत असत. मेंदीरत्त यांच्या निधनाने एएफआय आणि आशियाई ऍथलेटिक्स संघटनेची मोठी हानी झाली असल्याचे एएफआयचे अध्यक्ष अदेली सुमारीवाला यांनी म्हटले आहे.
आगामी टोकिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मेंदीरत्त यांची भारतीय पथकाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी यापूर्वी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघासमवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रवास केल्याने त्यांना संपूर्ण जगामध्ये शिस्तबद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जात असे. विश्व स्पर्धा, आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मेंदीरत्त हे भारतीय संघाचे एक यशस्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून गणले गेले. भारतीय क्रीडा क्षेत्राला डोपिंगपासून अलिप्त राखण्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील होते.