हारुगेरी येथील घटना : चाकूने सपासप वार : संशयिताची पोलीस कोठडीत रवानगी
वार्ताहर /कुडची
दहावीत शिकणाऱया मुलीने प्रेमाला नकार दिल्याने युवकाने चाकूने 6 ते 7 वार करून तिचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी हारुगेरी येथे घडली. अमीर जमादार असे संशयिताचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान विविध संघटनांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथे अमीर जमादार व मृत मुलगी या दोघांचे घर सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. अमीर जमादार हा दहावीत शिकणाऱया मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. दरम्यान रविवारी दुपारी सदर मुलगी आपल्या दोन बहिणी व मैत्रिणींसह घरी जात होती. याचवेळी हारुगेरी-तेरदाळ या मार्गावरील करनवाडी तोटजवळ दुपारी 2 च्या सुमारास अमीर जमादारने मुलीला अडविले. यावेळी अमीरने सदर मुलीला तू माझ्याशी बोलत का नाहीस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगताच मुलीने नकार देत सदर घटना घरी सांगण्याचा इशारा दिला. यावेळी रागाच्या भरात अमीरने सोबत आणलेल्या चाकूने मुलीवर 6 ते 7 ठिकाणी वार केले. यानंतर त्याने घटनास्थळावरून पोबारा केला.
चाकूने 6 ते 7 वार
6 ते 7 ठिकाणी वार झाल्याने मुलगी गंभीर जखमी झाली. नजीकच्या नागरिकांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी तिला गोकाककडे नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान हारुगेरी पोलिसांनी अमीर जमादार याला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर करून त्याची कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी हारुगेरी पोलीस स्थानकात घटनेची नोंद केली आहे. उपनिरीक्षक राघवेंद्र खोत, पोलीस निरीक्षक के. एस. हट्टी यांच्यासह अन्य सहकारी तपास करीत आहेत.
कठोरात कठोर कारवाई करा
एकतर्फी प्रेमातून दहावीत शिकणाऱया अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करून खून केल्याची घटना हारुगेरी शहरात वाऱयासारखी पसरली. या घटनेचा निषेध करत विविध संघटनांनी खूनी युवकावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.