ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली असून आज अखेर ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. ईडीने चौकशीसाठी खडसे यांना उद्या 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिरीश चौधरी यांना आजच ईडीने अटक केली आहे. गिरीश चौधरी यांना पाच दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. या दरम्यान चौधरी यांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीला आता एकनाथ खडसे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. यामुळे ईडीने एकनाथ खडसे यांनी समन्स पाठवले आहेत.
एकनाथ खडसे यांना समन्स पाठविण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. माजी भाजपा नेते असणारे एकनाथ खडसे यांना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावले होते.
यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता.