ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वागळे इस्टेट भागात शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स झळकले आहेत. या पोस्टर्सवर कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चैला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे दोन अडीच महिने घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार काही काळासाठी दुसऱ्या नेत्याकडे सोपविण्याची मागणी होत होती. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच नाव सगळय़ात हॉट फेव्हरिट मानले जात होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भावी मुख्यमंत्री बनवावे, अशी इच्छा शिवसैनिकांची आहे. हीच इच्छा ठाण्यातील शिवसैनिकांनी पुन्हा एकदा बॅनरमधून व्यक्त केली आहे.
त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख खरंच मुख्यमंत्रीपदाचा कारभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवायचा विचार करत आहेत का, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.