शनिवारी जिह्यातील 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येतील चढ-उतार सुरूच आहेत. शनिवारी जिह्यातील 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये बेळगाव शहर व उपनगरांतील चौघा जणांचा समावेश आहे. बुवाची सौंदत्ती (ता. रायबाग) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 35 हून अधिक झाली आहे. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या 9 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 26 हजार 598 जणांनी कोरोनावर मात केली असून 95 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
होन्नीहाळ (ता. बेळगाव), राणी चन्नम्मानगर, नानावाडी, वडगाव येथील चार महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुवाची सौंदत्ती येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाच्या नियमावलीनुसार एकाच ठिकाणी पाच रुग्ण आढळून आल्यास त्याला एक क्लस्टर ठरवून त्या ठिकाणी खबरदारी घेतली जाते.
उपलब्ध माहितीनुसार शुक्रवारी बुवाची सौंदत्ती येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्या वृद्धाच्या घरातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने गावातील 250 हून अधिक जणांचे स्वॅब घेतले असून ते तपासणीसाठी लॅबला पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच आणखी किती जणांना बाधा झाली आहे याचा उलगडा होणार आहे.