जगात अशाप्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया
फ्रान्सच्या एका व्यक्तीच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात आणि खांद्यांना प्रत्यारोपित करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. 49 वर्षीय इलेक्ट्रिशियन असलेल्या या व्यक्तीने 23 वर्षांपूर्वी एका दुर्घटनेत स्वतःचे दोन्ही हात गमावले होते.
फेलिक्स ग्रेटार्सन यांनी 1998 मध्ये स्वतःच्या दोन्ही हातांना एका इलेक्ट्रिक दुर्घटनेत गमाविले होते. एका पॉवरलाइनला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर फेलिक्स तीन महिन्यांपर्यंत कोमामध्ये होता आणि त्याच्यावर 54 शस्त्रक्रिया झाल्या होत्या.
फ्रान्सच्या लियोन शहरातील एडवर्ड हेरियट रुग्णालयात हातांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया 15 तासांपर्यंत चालली होती आणि याकरता 5 रुग्णालयांची पथके कार्यरत होती. शस्त्रक्रियेनंतर स्वतःची पत्नी आणि नात-नातवांची गळाभेट घेऊ शकत असल्याचे फेलिक्स यांनी म्हटले आहे.
दोन्ही हात गमावल्यावर फेलिक्स यांना नैराश्य येऊ लागले होते आणि यातून मद्य आणि अमली पदार्थांचे व्यसन जडले होते. यामुळे त्यांना एका वर्षातच दोनवेळा यकृत प्रत्यारोपण करावे लागले होते. या घटनेनंतर फेलिक्स स्वतःच्या हातांच्या प्रत्यारोपणावरून गंभीर झाले होते.
याप्रकरणी जॉन मायकल डबरनॉड या डॉक्टरने त्यांना मदत केली आहे. फेलिक्स यांनी खऱया हातांना जोडण्यापूर्वी प्रोस्थेटिक्सही लावून घेतले होते, पण त्यांना खऱया हातांची उणीव नेहमीच भासायची. 2007 मध्ये त्यांनी डॉक्टर मायकल यांना शोधत त्यांची भेट घेतली होती.
12 जानेवारी 2021 रोजी त्यांना एक डोनर मिळाला. त्यानंतर डबरनॉड यांच्या पथकचे मुख्य सर्जन एरम गॅजेरियन यांनी फेलिक्स यांच्यावर शस्त्रक्रिया केली. प्रत्यारोपणानंतर असहय़ वेदना होत होत्या. माझ्या हात आणि खांद्यावर एखादा ट्रक चढविला गेल्याचे वाटत होते. पण मी तरीही मानसिकदृष्टय़ा तयार होतो असे फेलिक्स यांनी म्हटले आहे.