20 वर्षीय प्रसिद्ध युटय़ूबर नजमाचा मृत्यू
26 ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटात अमेरिकेच्या 13 सैनिकांसोबत 170 लोकांचा मृत्यू झाला होता. मृत अफगाण नागरिकांमध्ये देशाचा एक प्रसिद्ध चेहरा देखील सामील होता. 20 वर्षीय नजमा सादिकीचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या काही तासांपूर्वी नजमाने स्वतःचा फेयरवेल व्हिडिओ पश्तो भाषेत चाहत्यांसाठी पोस्ट केला होता.
“बहुधा आम्ही आता कधीच भेटू शकणार नाही, पण आमच्या देशातील सद्यस्थिती एखाद्या दुस्वप्नाप्रमाणे विरून जावी अशी माझी इच्छा आहे’’ असे तिने व्हिडिओत म्हटले होते. पण तालिबानी राजवट हे स्वप्न नाही आणि हे सत्य पाहण्यासाठी ही कर्तबगार युटय़ूबर आता या जगात नाही.
प्रसिद्ध युटय़ूबर
अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाल्याच्या 4 दिवसांनी नजमाने स्वतःच्या घरात व्हिडिओ रिकॉर्ड केला होता, स्वतःच्या पांढऱया पोशाखात दिसून येणारी नजमा अखेरच्या व्हिडिओत अत्यंत निराश आणि दुःखी दिसून आली होती. “आता आम्हाला घरातून बाहेर पडण्याचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. याचमुळे सर्वांनी स्वतःचा अखेरचा व्हिडिओ रिकॉर्ड करावा. सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे’’ असे तिने यात म्हटले होते. नजमा कुकिंग किंवा पर्यटनस्थळी तरुण-तरुणींसोबत आणि त्यांच्यासाठी व्हिडिओ तयार करायची. अफगाणिस्तानच्या इनसाइडर युटय़ूब चॅनेलसाठी ती काम करत होती.
घरातून बाहेर पडण्यास वाटते भीती
काबूलच्या रस्त्यांवर बाहेर पडण्यास आता भीती वाटते. माझ्यासाठी प्रार्थना करा. येथील जीवन अत्यंत अवघड ठरले आहे. हे सर्व एका दुस्वप्नाप्रमाणे संपेल अशी मी आशा करते. एक दिवस आम्ही नक्की सुंदर सकाळ पाहू. आता हे अशक्य असल्याचे मी जाणते असे नजमाने अखेरच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते. या व्हिडिओनंतर नजमाने देश सोडण्याचा निर्णय घेतला. काबूल विमानतळावर पोहोचली पण तेथेही दुर्दैव आड आले. आत्मघाती हल्ल्यात नजमाचाही मृत्यू झाला. नजमा ही जर्नलिजमच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती.